पिंपरी : बेकायदेशीरपणे तंबाखू आणि पानमसाला पदार्थांची वाहतूक करणारा ट्रक वाकड पोलिसानी पकडला. त्यांच्याकडून 200 पोती तंबाखू व पानमसाला, चारचाकी, मोबाईल फोन, असा एकूण 52.20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गणेश वंजी साबळे (29, रा. साक्री, धुळे), संदीप गुलाब ठाकरे (27, रा. साक्री, धुळे) व विशाल पांडुरंग लवाळे (22, रा. मुळशी, पुणे) या तिघांना अटक केली आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डांगे चौकातून अवैध तंबाखू व पानमसाला वाहतूक करत असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रात्री साडे अकराच्या दरम्यान डांगे चौकात सापळा रचून हॉटेल ब्लू वॉटर याठिकाणी एका टेम्पोला (एमएच 18 एए 9421)अडवून तपासणी केली.
त्यावेळी टेम्पोत 100 पोती तंबाखू आणि 100 पोती पानमसाला आढळून आला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत 52.20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
हि कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगलीकर, संतोष पाटील, सुनील टोनपे, तपासी पथकाचे सहायक निरीक्षक संतोष पाटील, अभिजित जाधव आणि त्यांच्या पथकाने केली आहे.