Pune : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार जितेंद्र कंडारे यांच्याकडून पतसंस्थे बँकअप डेटा असलेल्या तीन हार्डडिस्क, चार मोबाईल आणि पतसंस्थेशी संबंधित काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
कंडारे यांना बुधवारी (ता. ३०) सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी नऊ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून कंडारे हा सात महिने फरार होता. या कालावधीमध्ये ते दिल्ली, गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. फरार कालावधीमध्ये त्यांनी पतसंस्थेतील दस्तऐवज, हार्डडिस्क वगैरे पुरावे अन्यत्र कोणाकडे लपवून ठेवला असल्याची किंवा नष्ट केला असल्याची दाट शक्यता आहे. अटक आरोपी हा पतसंस्थेच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याने त्याच्याकडे सखोल तपास करून अधिकाधिक पुरावा हस्तगत करण्यासाठी आरोपीस १४ दिवस पोलिस कोठडी देण्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला.
कंडारे आणि इतर आरोपींनी कट रचून पतसंस्थेच्या मालमत्तेची कमी किंमतीत बनावट लिलाव प्रक्रियेद्वारे विकल्या आहेत. त्यातील दोन मालमत्ता या पाहिजे आरोपी सुनील झंवर व अटक आरोपी सूरज झंवर यांनी विकत घेतल्या आहेत. दोन मालमत्ता त्यांच्या नातेवाईकांनी विकत घेतल्या असून त्याकरिता सुनील झंवर यांनीच पैसा पुरविल्याचे निष्पन्न झाले आहे, असे तपास अधिका-यांनी न्यायालयात सांगितले. ठेवीदारांच्या बाजूने ॲड मनोज नायक बाजू मांडताना म्हणाले की, ब-याच
कर्जदारांच्या कर्ज मागणी अर्ज फाईल व एफडी काही मँचिंग झालेल्या आहेत तर काही नाही. हे अत्यंत वेळकाढूपणाचे प्रकरण आहे. त्यामुळे यामागे प्रमुख सूत्रधार कोण आहे, हे शोधून काढायला हवे.