रेकी करुन 30 घरफोड्या करणाऱ्या चोरट्याकडून तब्बल 77 लाखांचा मुद्देमाल जप्त

चिंचवड पोलिसांची मोठी कामगिरी

0

पिंपरी : शातीर दिमाख वापरुन घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला चिंचवड पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून तब्बल 30 घरफोड्याचे गुन्हे उघडकीस आणून 77 लाख 47 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जे घर बंद आहे, त्याची दिवसभर पाहणी करुन रात्री घरफोडी केली जात होती. विशेष म्हणजे घरफोड्या करून मिळालेल्या पैशांतून सावकारी करत होता.

लखन अशोक जेटीथोर (32, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळ रा. सोलापूर) असे अटक केलेल्या अट्टल चोरट्याचे नाव आहे. त्याच्यासह रवी शिवाजी भोसले (42, रा. रहाटणी. मूळ रा. सोलापूर), सुरेश नारायण जाधव (42, रा. रहाटणी. मूळ रा. सातारा) यांना देखील अटक केली आहे. त्यांचा चौथा साथीदार कृष्णा जाधव सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लखन चायनीजची गाडी लावून त्यावर आपली उपजीविका चालवत असल्याचे दाखवत होता. दिवसा बंद घरांची रेकी करून रात्रीच्या वेळी देखील ती घरे बंद असल्याची खात्री करत असे. त्यानंतर त्याच्या सोयीने घरफोडी करण्यासाठी लागणारी हत्यारे लखन आजूबाजूच्या परिसरात अडगळीच्या ठिकाणी टाकत असे. मध्यरात्री दोन वाजल्यानंतर येऊन तो रेकी केलेले घर फोडत असे.

वाल्हेकरवाडी परिसरात घरफोडीच्या वारंवार घटना घडल्याने चिंचवड पोलिसांनी वाल्हेकरवाडी परिसरात लक्ष केंद्रीत केले. एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. त्यात एक संशयित व्यक्ती मास्क लावून जात असताना दिसले. मात्र, एका विशिष्ट ठिकाणी गेल्यावर संशयित व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळत नसे. त्यामुळे पोलिसांनी संशयित आरोपीची माहिती काढून ओळख पटवली.

लखन याच्यावर सन 2009 ते 2012 या कालावधीत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सदर बाजार आणि फौजदारचावडी पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने चिंचवड, भोसरी आणि चिखली परिसरात घरफोड्या केल्याचे कबूल केले.

लखन हा त्याचे साथीदार आरोपी रवी आणि सुरेश यांच्या मदतीने घरफोडी केलेला माल विकत असे. पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांना देखील अटक केली. वाल्हेकरवाडी परिसरात घरफोडी केल्यावर लखन त्याचा मित्र कृष्णा जाधव याच्या घरी जाऊन झोपत असे. कृष्णा जाधव सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लॉकडाऊनच्या कालावधीत लखनचा चोरीचा माल विकला गेला नाही. चोरीच्या पैशातून तो सावकारी करत असे. त्यातूनच त्याने एकाकडून फॉर्च्युनर कार जबरदस्तीने आणली होती. चोरी करून पैसे साठवून त्याला फ्लॅट घ्यायचा होता.

या कारवाईमुळे चिंचवड चोरी केलेले 78 तोळे सोने, 10 टीव्ही, गुन्ह्यासाठी वापरलेली फॉर्च्युनर असा एकूण 77 लाख 47 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपपोलीस आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू ठुबल, उपनिरीक्षक नामदेव तलवाडे, सहाय्यक पोलीस फौजदार पांडुरंग जगताप, पोलीस अंमलदार स्वप्निल शेलार, वृषिकेत पाटील, अवताडे, राजू जाधव, विजयकुमार आखाडे, नितीन राठोड, पंकज भदाणे, अमोल माने, गोविंद डोके, सदानंद रुद्राक्षे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.