पिंपरी : बारा बलुतेदार आणि सर्व बहुजन समाजाला एकत्र घेऊन चालणारा म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. राज्यपालांनी एकदा नव्हे, तर दोन वेळा असे केले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात योग्य भूमिका घेण्याची वेळ आली आहे, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपालांवर हल्ला चढवला. राज्यपालांना बाहेर पाठवा, अन्यथा महाराष्ट्र बंद होईल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
गेले अनेक दिवस राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी अनेक पक्ष, संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. पुण्यात बुधवारी अनेक पक्ष आणि संघटनांची एक बैठर पार पडली. यावेळी राज्यपालांच्या निषेधार्थ ‘13 डिसेंबर’ला ‘पुणे बंद’ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यांच्या समर्थनासाठी संभाजीराजे पिंपरी येथे आले होते. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी राज्यपालांचा निषेध करत सरकारला इशारा दिला.
संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्र हे इतर राज्यांना दिशा देणारे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला. मात्र, महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांबाबत आपण चर्चा करत बसलो आहोत. आपण एकत्र येऊन आपला आवाज दिल्लीपर्यंत पोचविण्याची वेळ आली आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची त्यांची हिंमत होतेच कशी, त्यानंतरही काही लोक त्यांना पाठीशी कसे घालतात? हा मोठा प्रश्न आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आणखी इतर चार जणांनी महाराजांबाबत चुकीचे विधान केले. त्यांचे धाडस तरी कसे होते?
राज्यपालांची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आंदोलन होत राहणार. प्रत्येक शहरातील आंदोलनाला जाण्यासाठी
आम्ही आणि आमचा पक्ष तयार आहोत. त्यामुळे राज्यपालांना लवकर महाराष्ट्राबाहेर पाठवा; अन्यथा आंदोलन तीव्र करू, असे यावेळी संभाजीराजे म्हणाले.