मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र लिहुन राज्यात खळबळ उडवून दिली आहे. यामधून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रूपयांचं टार्गेट दिलं होतं. निलंबीत सहाय्यक निरीक्षक आणि सध्या एनआयएच्या कोठडीत असलेले सचिन वाझे हे अनेकवेळा गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले होते.
परमबीर सिंह यांनी लिहीलेल्या 8 पानी पत्रामध्ये अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा आणि गंभीर आरोप म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटीचं टार्गेट दिलं होतं असं सांगितलं आहे. मात्र, परमबीर सिंह यांनी केलेला हा 100 कोटी रूपयांचा दावा हा कितपत खरा आहे हे आगामी काळात स्पष्ट होईल. मात्र, परमबीर सिंह यांनी केलेल्या पत्राव्दारे आरोपावरून विरोधी पक्षानं टीकेची झोड उठवली आहे.
दरम्यान, परमबीर सिंह यांनी हे सर्व आरोप त्यांची बदली झाल्यानंतर का केले हा प्रश्न आता समोर आला आहे. याबाबत परमबीर सिंह यांनी यापुर्वी कधी काही तक्रार का केली नाही? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र या पत्राने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.
स्वतःचा बचावासाठी खोटे आरोप : गृहमंत्री अनिल देशमुख
परमबीर सिंह यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे. मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबरि सिंह यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत आहे.