हैदराबाद : शारीरिक संबंध ठेवण्याच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात ओढून १८ महिलांचा खून करणाऱ्या ४५ वर्षीय सीरिअल किलरला पोलिसांनी अटक केली आहे. खूनाच्या प्रकाराशिवाय इतर अनेक गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीने गेल्या २४ वर्षात तब्बल १८ महिलांचा खून केला. हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी मंगळवारी दोम महिलांच्या हत्येप्रकरणी अटक केली असल्याचं जाहीर केलं. संयुक्त मोहीम राबवत आरोपीला अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर आरोपी २१ गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचं उघड झालं. यामध्ये १६ खून, संपत्तीशी संबंधित चार गुन्हे आणि पोलीस कोठडीतून पळून जाण्याच्या एका गुन्ह्याचा समावेश आहे.
वयाच्या २१ व्या वर्षीय आरोपीचं लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच त्याची पत्नी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली होती. तेव्हापासून त्याच्या मनात महिलांबद्दल द्वेष निर्माण झाला होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपीने २००३ पासून गुन्हे करण्यास सुरुवात केली. शरीरसुखाच्या बहाण्याने अविवाहित महिलांना तो आपल्या जाळ्यात ओढत असे. एकत्रित मद्यप्राशन केल्यानंतर तो त्या महिलेचा खून करायचा आणि नंतर त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू चोरुन घटनास्थळावरुन पळ काढत असे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.