नवी दिल्ली : शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरु झालेल्या वाक् युद्धाचा आजचा दुसरा अंक पहायला मिळाला. काल (मंगळवार) शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी किरीट सोमय्या यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद संपत नाही तोच काही मिनिटांत संजय राऊतांनी सोमय्या यांच्या आरोपांचा नवा बॉम्ब फोडला आहे. तसेच पुन्हा एकदा सोमय्या पितापुत्र नक्की जेलमध्ये जाणार, असंही राऊत यांनी म्हटलं.
संजय राऊत म्हणाले, अलिबागमधले 19 बंगले कुठे आहेत ? हा माझा प्रश्न आहे. देवस्थानाच्या जमिनी कुठे आहेत ?, संजय राऊतांची बेनामी प्रॉपर्टी कुठे आहे ?, अर्जुन खोतकरांना त्रास का दिला जातोय ?, भावना गवळी, आनंदराव अडसूळ यांचा गुन्हा काय ?, अमोल काळे कुठेय ? काय व्यवहार आहे हा ? असे प्रश्न विचारुन या प्रश्नांची उत्तरे द्या असे राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर खळबळजनक आरोप केले. ईडीच्या कारवाईची धमकी देऊन सोमय्या यांनी शेकडो कोटी रुपये जमवले असल्याचा आरोप राऊत यांनी केला. सोमय्या यांनी 15 कोटी रुपये ईडीच्या एका अधिकाऱ्याला दिले असल्याचा सनसनाटी आरोप राऊत यांनी केला. राऊत यांनी पुन्हा एकदा ईडीला आव्हान दिले आहे.
किरीट सोमय्या यांनी ईडी कारवाईची धमकी देऊन मुंबईतील जेव्हीपीडी येथील एक भूखंड बिल्डर मित्र अमित देसाई यांना मिळवून दिला. या भूखंडाची किंमत 100 कोटींहून अधिक आहे. परंतु ईडी कारवाईची धमकी देऊन सोमय्या यांनी हा भूखंड कमी किंमतीत मिळवून दिला. सोमय्या यांनी 15 कोटी रुपये ईडीच्या अधिकाऱ्याला दिल्याचे राऊत यांनी सांगितले.