पिंपरी : लॉकडाऊन काळात सर्वसामान्य नागरिकांचे हाल सुरू असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने शहरातील सुमारे साडेसात हजार श्वानांची नसबंदी केल्याचा अजब दावा केला आहे. बिलापोटी ठेकेदाराला तब्बल 73 लाख रुपये दिल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. बोगस बिले सादर करून पालिकेचे पैसे लाटले आहेत. यामध्ये भाजपाच्या सरचिटणीसचा हात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.
महापालिकेची नोव्हेंबर महिन्याची तहकूब सभा आज गुरुवारी (दि. 18) घेण्यात आली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. विषयपत्रिकेवर शहरातील भटक्या प्राण्यांसाठी महापालिका आणि मे. पीपल फॉर अॅनिमल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अॅनिमल शेल्टर (प्राणी सुश्रुषा केंद्र) आणि औषधोपचार केंद्र सुरु करण्याचा विषय होता. शहरातील भटक्या श्वानांच्या विषयावर नगरसेवकांनी जोरदार हल्लाबोल केला.
योगेश बहल म्हणाले, कोरोना काळात सत्ताधारी भाजपने भ्रष्टाचार केला. श्वानांच्या नसबंदीमध्ये पैसे खाल्ले. कोरोना काळात लॉकडाऊन लागू होता. सर्व बंद असताना या काळात महापालिकेने साडेसात हजार श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा केला आहे. निर्बीजीकरणाचे काम चार संस्थांना विभागून दिले आहे. त्यात जीवरक्षक अॅनिमल वेल्फेअर ट्रस्ट यांनी 1 मे 2020 ते 30 जुन 2020 आणि 1 ते 31 जुलै 2020 दरम्यान 1475 श्वानांची नसबंदी केल्याचे दाखविले आहे. त्यापोटी त्यांना 14 लाख 73 हजार 525 रुपये देण्यात आले आहेत.
सोसायटी फॉर ऑफ क्र्युलिटी या संस्थेने 1902 श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचे दाखविले आहे. त्यापोटी त्यांना 19 लाख 98 हजार रुपये दिले. अॅनिमल वेल्फेअर अर्जिक या संस्थेने 9 हजार 903 श्वानांचे निर्बीजीकरणाचे केल्याचे दाखविले. त्यापोटी त्यांना 19 लाख 18 हजार 997 रुपये आणि जॉनीस ट्रस्ट या संस्थेने 1 हजार 845 श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचे दाखविले. त्यासाठी त्यांना 18 लाख 43 हजार रुपये दिल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.
23 मार्च ते 8 ऑगस्ट 2020 दरम्यान पॉस्को या संस्थेने तेथील बायोमेडिकल कचरा उचलला नाही. त्यामुळे या काळात श्वानांचे निर्बीजीकरण झाले नसल्याचे स्पष्ट होते. इतक्या क्षमतेने शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्थाही उपलब्ध नाही. श्वानांची व्यवस्थित हाताळणी केली जात नाही. लॉकडाऊन काळात सर्व बंद असताना शस्त्रक्रिया कशा केल्या हा संशोधनाचा विषय आहे. यामध्ये 73 लाखाचा भ्रष्टाचार झाला असून भाजपचा एक सरचिटणीस या संस्थांशी संबंधित आहे. भाजपने श्वानांच्या निर्बीजीकरणातही पैसे खाल्ले आहेत, असा आरोपही बहल यांनी केला.
अजित गव्हाणे म्हणाले, श्वानांच्या निर्बीजीकरणात मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्याच्या खोलात जावे. त्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी. राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर म्हणाले, लॉकडाऊन काळात सर्व जग बंद असताना महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने सुमारे साडेसात हजार श्वानांचे निर्बीजीकरण केले ? या डॉक्टरांचा महापालिकेच्या प्रवेशद्वारावर सत्कार केला पाहिजे.
लॉकडाऊनमध्ये साडेसात हजार श्वानांचे निर्बीजीकरण कसे झाले, हा संशोधनाचा विषय आहे. हे सांगणा-या डॉक्टरांचा तर पद्मश्री पुरस्काराने गौरव करावा. यात भ्रष्टाचार झाला आहे. बिले अदा करताना लाखो रुपयांची उधळपट्टी केली आहे.