सराईत गुन्हेगारांकडून घरफोडीचे सात गुन्हे उघडकीस; वाकड पोलिसांची कामगिरी

0

पिंपरी : वाकड पोलिसांनी माईनॉरिटीज सुरक्षा महासंघ-नॅशनल पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष याला अटक केली. त्याच्यासह इतर साथीदारांकडून 6 लाख 87 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले. तसेच घरफोडीचे सात गुन्हेही उघडकीस आणले आहेत.

प्रकाश ऊर्फ नानाभाऊ शंकर लंके (44, रा. विश्रांतवाडी, पुणे), समीर ऊर्फ सलीम महेबूब पैलवान शेख (39, मारूंजीरोड, हिंजवडी) आणि ओंकार विभिषण काळे (18, रा. धानोरी रोड, पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंकज पाटील (रा. वाकड) यांच्या घरी 14 जानेवारी 2021 रोजी घरफोडी झाली होती. या घरफोडीचा तांत्रिक तपास केल्यावर पोलिसांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेतले असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत आणखी सहा गुन्हे केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आरोपींकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील 118 ग्रॅम सोन्याचे दागिने, 20 हजारांची रोकड, गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी तसेच चोरीच्या पैशातून घेतलेली नवीन जावा दुचाकी, लॅपटॉप, स्मार्ट वॉच, घरगुती साहित्य तसेच घरफोडी वापरण्यात येणारे साहित्य, असा एकूण सहा लाख 87 हजार 650 रुपयांचा ऐवज जप्त केला.

लंके हा माईनॉरिटीज सुरक्षा महासंघ-नॅशनल पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असल्याचे सांगत आहे. त्याबाबत त्याचे ओळखपत्र देखील त्याच्याकडे आहे. हाजी मस्तानच्या दत्तक पुत्र सुंदर शेखरची ही पार्टी आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्‍त रामनाथ पोकळे, उपायुकत आनंद भोईटे, सहायक आयुक्‍त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, तपास पथकाचे सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, दीपक कादबाने, कर्मचारी बिभिषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र मारणे, दीपक भोसले, बापूसाहेब धुमाळ, विक्रम जगदाळे, जावेद पठाण, नितीन ढोरजे, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, नितीन गेंगजे, सुरज सुतार, शाम बाबा, सचिन नरूटे, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले, कौतेय खराडे आणि नुतन कोंडे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.