पुणे : शहरात आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, पर्यटनमंत्री यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे असे एकूण सात मंत्री शुक्रवारी (दि.2) येत आहेत. यामुळे शहरात शुक्रवारी मंत्र्यांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. शासकीय कार्यक्रम, गणेश मंडळांना भेटी, प्रकल्पांचा आढावा, फेस्टिव्हलचे उद्घाटन या कार्यक्रमांसाठी हे मंत्री पुण्यात उपस्थित राहणार आहे.
शहरात पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. पीएमपीच्या ई-डेपोचे उद्घाटनच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. तर महसूलमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे पहिल्यांदाच पुण्यात येत असून, ते नोंदणी व मुद्रांक भवन इमारतीचे भूमिपूजन करणार आहेत. याचसह पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे शहरात येणार आहेत. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकासमंत्री मंगल प्रसाद लोढा उपस्थित राहणार आहे. तर सिम्बायोसिस येथील व्याख्यानमालेसाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे येणार आहेत.
पुण्यातील गणेशोत्सव पहिल्यापासूनच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. मागील अनेक वर्षांपासून राजकीय नेत्यांपासून सिनेसृष्टीतील कलाकार गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध मंडळांना भेटी देऊन गणेशाचे दर्शन घेतात. राजकीयनाट्य घडल्यानंतर शिंदे व फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर पहिल्यांदाच शहरात एवढे कार्यक्रम एकाच दिवशी होत आहेत.
आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांमध्ये शक्तिप्रदर्शन करण्यासाठी स्पर्धा लागणार आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता हे मंत्री आरोप-प्रत्यारोप, राजकीय भाष्य, नव्या घोषणा, एकमेकांना कोपरखळ्या, जुने किस्से, आठवणी अथवा विरोधकांचा समाचार कसा घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.