मुंबई ः मागील ४० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकरी नेत्यांशी बुधवारी बैठक झाली. परंतु, त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. आज पुन्हा सातव्या वेळेस बैठक होणार आहे. कायदे रद्द करणे, किमान आधारभूत किंमत कायद्याची हमी देणे, या मागण्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे, यातून काही सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा केंद्राला आणि शेतकरी नेत्यांना आहे.
आजच्या बैठकीत प्रस्तावित वीज अधिनियम दुरुस्ती कायद्यात बदल केले जाणार असून, वीज वापरावर शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान पूर्वीप्रमाणे कायम राहील. तसेच प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील अध्यादेशातही दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन केंद्राकडून मिळाले होते. कृषी कायदे रद्द करण्याबरोबरच ‘एमएसपी’च्या मुद्यावरही आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
असे असले तरी, कृषी कायदे रद्द होणार नाहीत अशाप्रकारचे संकेत केंद्राने दिलेले आहेत. मात्र, दोन मागण्या केंद्राकडून मान्य होणार असल्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्याला आशा वाटू लागली आहे. दरम्यान, सिंघू सीमेवरील शेतकरी नेते गुरविंदर सिंग यांनी सांगितले की, “रात्रभर झालेल्या पावसामुळे दिल्लीच्या वेशींवर आंदोलनक शेतकऱ्यांचे रविवारी सकाळी हाल झाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी पाणी साचले. बहुतांश शेतकऱ्यांचे तंबू जलरोधक आहेत. त्यामुळे पावसापासून बचाव झाला तरी पाणी साचल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली.”