पिंपरी : पुणे – मुंबई महामार्गावरील असलेल्या वैभव लॉज किवळे, रावेत लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन महिलांची सुटका करुन एकाला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.13) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास वैभव लॉज किवळे, रावेत येथे करण्यात आली.
मोहम्मद बाशा शेख (45 रा. एमबी कॅम्प, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका महिलेच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक विजय लक्ष्मण कांबळे यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथील वैभव लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. यात दोन पीडित महिलांची सुटका केली. आरोपी हे पीडित महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेऊन त्यातून मिळालेल्या पैशातून स्वत:ची उपजिविका भागवित असल्याचे तपासात समोर आले. या कारवाईत दोन हजार 30 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.