पिंपरी : चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधू आणि भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी मंगळवारी (दि. २१) सांगवी, नवी सांगवी भागातपदयात्रा, कोपरा सभा आणि गाठीभेटी घेऊन जोरदार प्रचार केला. एक मत लक्ष्मणभाऊंच्या विकासासाठी द्या, असे आवाहन नागरिकांना केले. त्यांच्या या पदयात्रेमुळे सांगवीमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले होते. सांगवीकरांनीही त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आमचे मत विकासालाच असून, लक्ष्मणभाऊंच्या पत्नीला एक लाखाच्या मताधिक्याने निवडून देण्याचे वचन शंकर जगताप यांना दिले.
पोटनिवडणुकीतील भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना आणि प्रहार संघटना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी संपूर्ण जगताप कुटुंबाने मतदारसंघ पिजून काढला आहे. घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेत एक मत लक्ष्मणभाऊंच्या विकासाला द्या, असे आवाहन हे कुटुंब करत आहे. लक्ष्मणभाऊंच्या निधनाचे दुःख बाजूला सारून कुटुंब करत असलेल्या प्रचारामुळे त्यांचे लोकांसोबत एक प्रकारचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी जेथे जातील तेथे जगताप कुटुंबातील सदस्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधू आणि पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे दीर शंकर जगताप हे पायाला भिंगरी लावून मतदारसंघात प्रचारासाठी फिरत आहेत. मंगळवारी त्यांनी नवी सांगवी आणि सांगवी भागात पदयात्रा, घरोघरी गाठीभेटी आणि कोपरा सभा घेत नागरिकांशी संवाद साधला. लक्ष्मणभाऊंनी केलेला विकास पहा आणि त्याचाच विचार करून माझ्या वहिनीला मतदान करा. कोणीही कितीही भूलथापा मारत असले तरी लक्ष्मणभाऊंनी केलेला विकास तुमच्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही नागरिक सुज्ञ आहात. केलेल्या विकासाला मत द्या, असे आवाहन ते करत होते.
यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, माजी नगरसेविका माधवी राजापुरे, योगिता नागरगोजे, भाजपचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास बढे, गणेश बँकेचे उपाध्यक्ष सुरेश तावरे, प्रभाग अध्यक्ष सखाराम रेडेकर, सहकार आघाडीचे सूर्यकांत गोफणे, देवीदास शेलार, सुरेश शिंदे, संजय मराठे, भाऊसाहेब जाधव, संदिप दरेकर, सुनील कोकाटे, आप्पा पाटील, श्यामराव पाताडे, संभाजी ढवळे, अशोक कवडे आदी उपस्थित होते.
शंकर जगताप यांच्या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत होता. लक्ष्मणभाऊंनी खरोखरच सांगवीचा विकास केलेला आहे. त्यामुळे आमचे मत भाजपलाच, असे नागरिक विश्वासाने सांगत होते. तसेच आम्ही तुमच्या रुपाने लक्ष्मणभाऊंना पाहत असल्यामुळे त्यांच्या विकासाची परंपरा तुम्ही सर्व कुटुंबिय पुढे चालवणार यात काही शंकाच नसल्याचा विश्वासही नागरिक व्यक्त करत होते. कोणी किती काहीही सांगितले तरी आम्ही भाजपला मतदान करून दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहणार असल्याचे सांगवीतील नागरिकांनी शंकर जगताप यांना सांगितले.