नवी दिल्ली : शरद पवारांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता या ठरावाची शरद पवारांची भेट घेऊन त्यांना माहिती देणार आहोत. तसेच त्यांना पदावर कायम राहण्याबाबत विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी 15 सदस्यीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा करण्यात आली. समिती जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल असे पवार यांनी याआधीच म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल म्हणाले, लोक माझे सांगातीच्या कार्यक्रमात शरद पवारांनी घोषणा केली होती. त्याचवेळी त्यांनी अध्यक्षपद कोणाकडे द्यावे, यासाठी समिती गठित केली होती. मी राष्ट्रीय उपाध्यक्ष असल्याने माझ्याकडे ही जबाबदारी त्यांनी भाषणातून दिली होती. आम्ही हा निर्णय ऐकून स्तब्ध झालो होतो. आम्हाला या निर्णयाची जराही कल्पना नव्हती. आम्ही पवार साहेबांची वारंवार भेट घेत त्यांना याबाबत विनंती करत राहिलो.