पिंपरी : येथील शगुन चौकात एका महिला वाहतूक पोलिसाने कारवाई न करण्यासाठी एका तरुणीकडून पैसे घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करुन तत्काळ ‘त्या’ वाहतूक पोलीस महिलेस पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी निलंबीत केले आहे.
स्वाती सोन्नर असे त्या पोलीस महिलेचे नाव असून त्या पिंपरी वाहतूक विभागात कार्यरत होत्या.
पोलीस शगुन चौकात अन्य सहका-यांसोबत कर्तव्य बजावत असताना तिथे एका मोपेड दुचाकीवरून दोन महिला आल्या. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. ही कारवाई टाळण्यासाठी काही रक्कम घेण्याची तडजोड झाली.
तरुणीने वाहतूक पोलीस महिलेच्या पॅन्टच्या मागच्या खिशात पैसे ठेवले आणि पोलीस महिलेने ते स्वीकारले असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. वरिष्ठ पोलीस अधिका-यांपर्यंत हा व्हिडीओ जाऊन पोहोचला आणि नंतर कारवाई करण्यात आली आहे.