मुंबई : वरळीतील स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात काल मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. मात्र, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या या मतदारसंघातील नागरिकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे मैदान रिकामे राहिले आणि मिंध्यांचा पुरता फियास्को झाला, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाने या सभेतील रिकाम्या खुर्चांचे फोटो व व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
ठाकरे गटाचे मुखपत्र सामनामध्ये याबाबत म्हटले आहे की, शिवसेनेशी गद्दारी करणाऱया मिंध्यांचे स्वागत आज वरळीकरांनी रिकाम्या खुर्च्यांनी केले. कोळी बांधवांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्काराचा कार्यक्रम वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानात आयोजित करण्यात आला होता. तसे होर्डिंग्ज मिंधे गटाकडून लावण्यात आले होते. मात्र, सभेला काही मोजकेच लोक व्यासपीठाजवळच्या खुर्च्यांवर बसलेले दिसले. पाठीमागच्या हजारो खुर्च्या रिकाम्या होत्या.
सामनात म्हटले आहे की, उपस्थितांना कोळी बांधवांच्या पारंपरिक टोप्या देऊन मिंध्यांनी वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला होता. अगदी पत्रकार आणि साध्या वेशातील पोलिसांनाही टोप्या वाटल्या गेल्या, पण सभा फ्लॉप ठरली. नागरी सत्काराचे निमित्त करून जाहीर सभा घेण्यात आली. वरळीत शक्तिप्रदर्शन करण्याच्या इराद्यानेच हा सगळा घाट घालण्यात आला. या सभेचा मोठा गाजावाजा केला गेला. मात्र, प्रत्यक्षात मिंधे तोंडावर आपटले.
शिवसेनेने पुढे म्हटले आहे की, वरळी स्पोर्टस् क्लबच्या विस्तीर्ण मैदानात सभेची जय्यत तयारी करण्यात आली होती. खूप मोठ्या प्रमाणात खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. मात्र, सात वाजले तरी मैदान रिकामेच होते. त्यामुळे मिंध्यांची पंचाईत झाली. सभेला गर्दी नसल्याचे कळल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही उशिराने सभास्थळी पोहचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाषण सुरू असतानाही अनेक लोक निघून गेले.
रिकाम्या खुर्च्यांचे व्हिडीओमध्ये झळकू नयेत म्हणून कंत्राटदाराला कामाला लावले गेले. रिकामी खुर्च्या घाईघाईत हटवल्या गेल्या. तरीही रिकामी खुर्च्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेच, असे शिवसेनेने म्हटले आहे.