मुंबई : शिर्डी साई संस्थान आणि पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या विश्वस्तपदी नेमणुकीबाबत तोडगा निघाला आहे. शिर्डी साई संस्थान अध्यक्षपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी दावा केला होता. मात्र, आज महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला आहे.
या बैठकीत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत महामंडळ नियुक्त्या आणि साई संस्थान, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी संस्थान विश्वस्तपदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आता शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर काँग्रेसच्या पारड्यात गेले आहे. आशुतोष काळे हे शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष असणार आहेत.
कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबा आणि पंढऱपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानच्या विश्वस्तपदावर वर्णी लागण्यासाठी राजकीय मंडळींकडून फिल्डिंग लावण्यात येत होती. अखेर या संस्थानचे विश्वस्तपद, अध्यक्षपदाच्या संदर्भात निर्णय झाला आहे.
महामंडळांच्या नियुक्त्या 15 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहेत. तिन्ही पक्षांना समसमाना वाटप आणि अपक्षांनाही हिस्सा देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.