शिर्डी : नववर्षाच्या निमित्त दर्शन घेण्यासाठी जात असताना अडविल्याने शिर्डीत ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. नगराध्यक्षांसह अनेक गावकऱ्यांना दर्शनासाठी मंदिरात न जाता कळसाचे दर्शन घेणे पसंत केले.
नवीन वर्षानिमित्त अनेक शिर्डीकर 31 डिसेंबरच्या मध्यरात्री अनेक वर्षांपासून साईबाबांच्या मंदिरात दर्शनाला जातात. मात्र, यंदा संस्थान प्रशासनाच्या धोरणामुळे अनेक शिर्डीकरांना नविन वर्ष प्रारंभाला मंदिरात जाता आलं नाही.
शिर्डीचे नवविर्वाचित नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी विश्वस्त तथा शिवसेनेच्या नगरसेविका अनिता जगताप, माजी विश्वस्त सचिन तांबे, नगरसेवक सुजीत गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांच्यासह अनेक शिर्डीकरांना मुख्यकार्यकारी आधिकारी कान्हूराज बगाटे यांनी साईमंदिरात जाताना रोखले.
कार्यकारी आधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना शनिगेट जवळून बाहेर काढले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी शिर्डी ग्रामस्थ आणि मुख्य कार्यकारी बगाटे यांच्यात बराच वेळ खंडाजंगी झाली.
बराच वेळ गोंधळ झाल्यानंतर ग्रामस्थांचा रोष पाहता मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिलगीरी व्यक्त केली. मात्र, ग्रामस्थांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याने अनेक ग्रामस्थांनी मंदिरात न जाता बाहेरूनच साईंच दर्शन घेत मुख्य अधिकारी बगाटे यांच्या वागणुकीचा निषेध केला आहे.