नगर ः ”तुमचे महाविकास आघाडीचे सरकार उत्तम चालले आहे. मग, आमच्या लोकांनी आकर्षिक का करता आहात? तुम्ही सरकार चालवा आम्ही विरोध पक्षा सांभाळू”, अशा प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजिद पवार यांनी भाजपाचे काही आमदार आमच्या संपर्कात असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “अजितदादा खूप चांगले नेते आहेत. चांगले काम करतात. पण, अजित पवारांमध्ये ताकद असती तर ८० तासांचे सरकार त्यांना टिकवता आले असते”, असा टोला त्यांनी लगावला.
”आम्हीदेखील ताकदीने निवडणुका लढविणार आहोत. शिवसेना सोबत नसल्याने आमचे नुकसान होते. मात्र, शिवसेना सत्तेत असल्याने त्यांचेही मोठे नुकसान होत आहे. आम्हाला काय फरक पडत नाही. मात्र, शिवसेना संपत चाललीय”, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.
कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”एखाद्या घटनेसंदर्भात न्यायालयात जायचे नाही का? त्यावर न्यायालयाने निर्णय द्यायचे नाहीत का? मग, त्यांची दादागिरी चालणार का? यांना कोर्टाचे निर्णय मान्य नाहीत, निवडणूक आयोगाचे निर्णय मान्य नाहीत, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर देशाचा कारभार उत्तम सुरू आहे, हे तुम्हाला मान्य नाही का?”, असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले.