पालघर : महाविकास आघाडी सरकारमधील शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना एका प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याचे ताजे असतानाच शिवसेनेचे पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांना कोर्टाने दणका दिला आहे.
शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच 1 कोटी 75 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. चेक बाऊन्स केस प्रकरणात पालघर कोर्टाने हा निकाल दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने एका प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गावित यांना पालघर जिल्हा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालयाने एक वर्षाच्या तुरंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
गावित यांना एक वर्ष तुरुंगवास आणि 1 कोटी 75 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याशिवाय या संदर्भात गावित यांना अपिल करुन निकालाविरोधात स्थगिती आणण्याची मुभा देण्यात आली आहे.
खासदार गावित यांनी याप्रकरणी कोर्टात दाद मागितल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी न्यायालयाने एक महिन्याची स्थगिती दिल्याचेही वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील सुनावणी 14 मार्च 2022 रोजी होणार आहे.
खासदार गावित यांनी पालघर मधील साईनगर येथील आपली जागा विकसित करण्यापोटी पालघर पूर्व येथील चिराग किर्ती बाफना यांच्याकडून एक कोटींची आगाऊ रक्कम घेतली होती. परंतु एकच जमीन दोन लोकांना देण्यात आल्याचे समोर आल्यावर बाफना यांनी 8 ऑक्टोबर 2014 मध्ये पालघर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दावा दाखल केला होता.
याप्रकरणात 2019 मध्ये 2 कोटी 50 लाखाची तडजोड झाली होती. या प्रकरणी एक कोटींचा चेक वटल्यानंतर उर्वरित 25 लाखाचे 6 चेक मात्र बाऊन्स झाल्याने कलम 138 प्रमाणे बाफना यांनी दावा दाखल केला.
या प्रकरणावर सुनावणी झाल्यानंतर सोमवारी अंतिम सुनावणी झाली आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग चे न्यायाधीश विक्रांत खंदारे यांनी गावित यांना एक वर्ष तुरुंगवास आणि 1 कोटी 75 लाखांचा दंड ठोठावल्याचे बाफना
यांचे वकील अॅड. सुधीर गुप्ता यांनी सांगितले.