शिवसेना-संभाजी ब्रिगेड एकत्र; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत

0

मुंबई : राज्याच्या राजकारणातून महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपस्थित होते. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र मैदानात उतरणार असल्याचंही यावेळी घोषणा करण्यात आली. सोबतच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित मेळावे देखील घेणार आहे.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे. यालाच लोकशाही मानणारे लोकं आता बेतालपणे बोलत आहेत. कोर्टातील निर्णय हा देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील, याचा निर्णय असेल. आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असं ठाकरे म्हणाले.

ठाकरेंनी पुढं म्हटलं की, मला आपण एकत्र आल्याचा आनंद आहे. आपली भूमिका रोखठोक आहे. ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत. आम्ही सत्तेत होतो, सत्ता पुढे येणारच आहे. काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात. ही आपली वैचारिक युती झाली आहे. महाराष्ट्रात आज जे काही घडवलं किंवा बिघडवलं ती महाराष्ट्राची ओळख नाही. शिवरायांचा महाराष्ट्र आहे असं काही जण म्हणतात पण तसं वागत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. आमचं हिंदुत्व पटल्यानं संभाजी ब्रिगेड सोबत आली आहे. आपण दुहीच्या शापाला गाडून टाकू. संभाजी ब्रिगेडसोबत मतभिन्नता किती आहे यापेक्षा मतऐक्य किती आहे हे महत्वाचं आहे. दोन्ही पक्षांनी मतभिन्नता कुठं आहे यावर विचार करुन समन्वयानं काम करु, असंही ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, या एकीनं शिवप्रेमी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला मानणारी मंडळी आनंदी होईल. संविधान टिकवण्यासाठी ही युती झाली आहे.

मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना प्रबोधनकारांचा विचार आक्रमकपणे मांडला. त्यांनी संघप्रणित विषमतावादी विचारांना सर्वशक्तीनिशी कार्यपद्धतीनं विरोध केला. ते लोकांच्या बाजूने कायम राहिले. संभाजी ब्रिगेड देखील लोकहित आणि महाराष्ट्राचं हित याच पार्श्वभूमीवर काम करत आहे. आता छोटे पक्ष संपवण्याचं कारस्थान सध्या सुरु आहे. लोकशाही सध्या धोक्यात आली आहे. छोटे पक्ष, संघटना आणि विचारधारा अस्तित्वात ठेवायची असेल तर एकत्र येणं गरजेचं आहे, त्यामुळं आम्ही एकत्र आलो आहोत. लवकरच एक महामेळावा घेतला जाईल, असं बनबरे यांनी सांगितलं.

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे म्हणाले की, एक चांगलं समीकरण शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या एकत्र येण्यानं तयार होणार आहे. संभाजी ब्रिगेड गेल्या 30 वर्षांपासून राज्यात काम करत आहे. राजसत्ता ही सर्वोच्च सत्ता आहे. व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी सत्तेत येणं गरजेचं आहे. त्यामुळं आम्ही 2016 रोजी संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष झाला. आम्ही विधानसभा, लोकसभासह सर्व निवडणुका लढवणार आहोत, त्यासाठी आम्ही शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडनं एकत्र यायचं ठरवलं आहे. देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. देशात विषमतावादी वातावरण झालं आहे. आज क्रांतीची गरज आहे, त्यामुळं आम्ही एकत्र आलो आहोत, असं आखरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.