मुंबई : काल विधीमंडळ सभागृहात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपा आणि शिंदे गटाचे मिळून आम्ही निवडणुकीत 200 आमदार निवडूण आणू असा दावा केला होता. तसेच बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात, अवतीभवती असणार्या चार लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली असे म्हटले होते. त्यातच शिंदे गटाने आदित्य ठाकरे वगळून शिवसेनेच्या 14 आमदारांवर व्हीप न पाळल्याने कारवाई करावी असे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. या सर्वावर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत म्हणाले, आता निवडणुका जरी लागल्या, तरी शिवसेनेला 100 हून जास्त जागा मिळतील. शिंदे गटातील आमदारांवर बोलताना ममता बॅनर्जी यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. सर्व आमदारांना केवळ पैसे नाही मिळालेत, त्यांना आणखीही खूप काही मिळाले आहे. पण आता नवे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघांनीही महाराष्ट्राच्या हितासाठी काम केले पाहिजे.
गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले, या चार लोकांमुळेच तुम्हाला सत्ता मिळाली. ती जी चार लोक ते म्हणतायत. ते सतत पक्षाचे काम करत होते. आजही पक्षाचेच काम करत आहेत. अडीच वर्ष का होईना तुम्ही सत्तेत होतात, तेव्हाही हे चार लोक, ज्यांना तुम्ही आज बदनाम करण्याचा प्रयत्न करताय, ते आजही पक्षाचे निष्ठावान आहेत.
शिंदे गटावर हल्लाबोल करताना संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे हे दूधखुळे नाहीत. ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. जाणार्यांना फक्त बहाणा हवा असतो. ठिक आहे तुम्ही जा, बहाणे सांगू नका.
संजय राऊत पुढे म्हणाले, 14 आमदारांना नोटीस पाठवली आहे. ते बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहेत. मुख्यमंत्री विश्वासदर्शक ठराव जिंकतात, त्यावेळी त्यांना आपल्या भूमिका मांडतात. त्यांनी राज्याची भूमिका न मांडता, पक्षाविरोधात बंड का केले? यावर खुलासे दिले. नारायण राणेंचे भाषणही याच प्रकारचे होते.
छगन भुजबळांचे भाषणही असेच होते. पक्ष सोडणारा किंवा पक्षाशी प्रतारणा करणारा नेता ज्यावेळी भाषण करतो त्यावेळी त्याला खुलासेच द्यावे लागतात.