नगर ः “औरंगाबाद नामांतरच्या मुद्द्यावरून शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मतदारांनी कशा थापा मारायच्या, त्यांनी भूरळ कशी घालायची, यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. औरंगाबादच्या नागरिकांना ८-८ दिवस पिण्याच्या पाण्याची वाट बघावी लागते, या मुद्द्यावरून लक्ष हटविण्यासाठी औरंगबाद नामांतराचा मुद्दा उपस्थित केला आहे”, असा आरोप भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी महाजन नगरला गेले होते. त्यावेळी त्या पत्रकारांशी संवाद साधला. महाजन म्हणाले की, “नामांतराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी होईल का नाही? हा त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेस आणि शिवसेना या दोघांचे विचार पूर्व-पश्चिम आहेत. तरीसुद्धा त्यांनी युती केली. सत्तेसाठी, खुर्चीसाठी शिवसेना काही करू शकते, हे आपण या माध्यमातून पाहिले आहे. त्यामुळे त्यांना नामांतराच्या मुद्द्याचे फार घेणेदेणे नाही. ही फक्त महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची घोषणाबाजी चालली आहे. ते शेवटच्या क्षणी तडजोड करतील”, असाही आरोप महाजन यांनी शिवसेनेवर केला आहे.
पूर्वाश्रमीचे भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांच्याविषयी प्रश्न विचारला असता महाजन म्हणाले की, “एकनाथ खडसे यांनी कुठे जावे किंवा जाऊ नये ? हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे यावर मत व्यक्त करायचे कोणतेच कारण नाही. ईडीकडून अनेकांच्या चौकशा सुरू झाल्या आहेत. ईडी आधी चौकशी करते व दोषी आढळल्यानंतरच कारवाई करते. त्यामुळे विनाकारण वक्तव्य करणे चुकीचे आहे. ईडीने ज्यांना ज्यांना हिशोब मागितला आहे, त्यांनी तो द्यावा”, असेही मत त्यांनी व्यक्त केले.