पुणे : 76 वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस देऊन, तिचा चेहरा प्लॅस्टिक पिशवीत घालून त्यांचा खून केला व त्यानंतर मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गणेश मनोहर फरताडे (42) आणि त्याची आई निर्मला मनोहर फरताडे (76, रा. अक्षय गार्डन सोसायटी, धनकवडी) असे या दोघांची नावे आहेत.
याप्रकरणी गणेश याची मावस बहिण यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश फरताडे व आपली आई निर्मला फरताडे हे दोघे धनकवडीमध्ये रहात होते. गणेशला काही कामधंदा नव्हता. तसेच त्याच्यावर कर्जही झाले होते. बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे तो त्रासला होता.
या कारणावरुन त्याने आईला औषधाचा ओव्हर डोस दिला. ती निपचित पडल्यावर तिच्या चेहर्यावर प्लॅस्टिकची पिशवी घालून गळ्यास पांढर्या रंगाच्या दोरीने घट्ट बांधून तिचा खून केला. त्यानंतर तो घराच्या छतावर गेला. तेथील लोखंडी हुकाला नायलॉनची दोरी बांधून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पोलीस निरीक्षक मुलाणी अधिक तपास करीत आहेत.
गणेश फरताडे हा इंजिनिअर होता अशी माहिती समोर आली आहे. त्याची आई खूप आजारी असायची. औषधांना खूप खर्च होत होता.