धक्कादायक! ‘हॉरर मुव्ही’ पाहून आठ वर्षीय मुलाने घेतली फाशी

0

पिंपरी : थेरगाव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आठ वर्षाच्या मुलाने ‘हॉरर’ चित्रपट पाहून राहते घरात स्वतःगळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे या मुलाने खेळत असताना बाहुलीला पहिली फाशी दिली आणि नंतर स्वतः फाशी लावून घेतली. ही घटना रविवारी (दि. 29) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.

कमल खेम साउद (वय 8, रा. सोळा नंबर बस स्टॉप, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कमल रविवारी त्याच्या खोलीत बाहुलीशी खेळत होता. त्यावेळी त्याची आई घरात काम करत होती, तर वडील बाहेर गेले होते. कमलने बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून तिला फाशी दिले. बाहुली आपल्याला सोडून गेल्याचा समज झाल्याने त्याने घरातील खिडकीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. कमलच्या आईने काम करत असताना त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो बाहुलीसोबत खेळत होता. काही वेळाने आईने पाहिले असता कमल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

आईने कमलकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. वाकड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. एखाद्या कैद्याला ज्याप्रमाणे फाशी देतात त्या प्रमाणे बाहुलीच्या तोंडाला कापड गुंडाळले होते. कमल हॉरर फिल्म पाहत असे, त्यातूनच त्याने हे कृत्य केले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.