धक्कादायक…आईच्या प्रियकराला ब्लॅकमेल; तरुणी प्रियकरासह गजाआड

0

पिंपरी : प्रियकराच्या मदतीने आईच्या प्रियकराला ब्लॅकमेल करुन पैसे मागणाऱ्या मुलीसह तिच्या प्रियकराला पालिसांनी अटक केली आहे. एका 21 वर्षीय तरुणीने स्वतःच्या आईचे व्हाट्सअप अकाऊंट हॅक करून एका पुरुषासोबत असणारे प्रेमसंबंध तिने उघडकीस आणले.

त्यानंतर आईच्या प्रियकराला ब्लॅकमेल करत त्याच्याकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. खंडणीतील एक लाख रक्कम स्वीकारताना पोलिसांनी या तरुणीला आणि तिच्या प्रियकराला रंगेहात पकडले आणि दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

मिथून मोहन गायकवाड (29) आणि एका 21 वर्षीय तरुणीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता आठ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी एका 42 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की,  तक्रारदार व्यक्तीचे एका 40 वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या महिलेच्या मुलीला या दोघांवर संशय होता. या दोघांचे प्रेम प्रकरण उघडकीस आणण्यासाठी या मुलीने स्वतःच्या आईचा व्हाट्सअप हॅक केले. त्यावेळी तिला या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. व्हाट्सअप हे केल्यानंतर तिला काही फोटो आणि व्हिडिओ देखील मिळाले होते. हेच फोटो आणि व्हिडिओ तिने आपल्या प्रियकराला दाखवले. आणि त्यानंतर सुरू झाला खंडणीचा प्रकार.

आरोपींनी तक्रारदाराला संपर्क साधून, दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून पंधरा लाख रुपये खंडणीची मागणी केली. तक्रारदाराने देखील त्यांच्या दबावाला बळी पडून व दोन लाख 60 हजार रुपये इतकी रक्कम त्यांना वेळोवेळी दिली होती. परंतु, आणखी पैशाची मागणी होत असल्याने त्याने पोलिसांना संपर्क साधला. उर्वरित पैसे घेण्यासाठी त्यांना बोलावून पोलिसांनी दगडूशेठ गणपती मंदिराजवळ सापळा रचला. आणि पैसे घेण्यासाठी आलेल्या मिथून गायकवाड याला 1 लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने प्रेयसीसोबत म्हणून हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस कर्मचारी पांडुरंग वांजळे, मधुकर तुपसुंदर, संजय भापकर, रवींद्र फुलपगारे, प्रवीण राजपूत, अतुल साठे, अमर पवार, राजेंद्र लांडगे आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.