धक्कादायक : ‘लिव्ह इन पार्टनर’ची निर्घृण हत्या

0

मुंबई : मुंबईतील एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. कहर म्हणजे या व्यक्तीने तिचे केवळ तुकडेच केले नाही, तर हे तुकडे कुकरमध्ये शिजवून काही कुत्र्याला खाऊ घातल्याची संतापजनक बाबही समोर आली आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, मुंबईतील मीरा रोड भागातील गीता-आकाशदीप सोसायटीत ही घटना घडली आहे. सोसायटीच्या 7 व्या मजल्यावर 56 वर्षीय मनोज साहनी आपली 36 वर्षीय लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य यांच्यासोबत प्रदिर्घ काळापासून राहत होता. काही दिवसांपासून मनोजच्या फ्लॅटमधून विचित्र दुर्गंधी येत होती. या दुर्गंधीने त्याचे शेजारी पुरते हैरान झाले होते. त्यांनी कंटाळून या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

माहिती मिळताच नया नगर पोलिस ठाण्याचे अधिकारी मनोजच्या फ्लॅटवर पोहोचले. त्यांनी मनोजचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडल्यानंतर ते आत पोहोचले असता त्यांना व इतर व्यक्तींना आत उग्र वास आला. घराची झडती घेतली असा त्यांना महिलेच्या मृतदेहाचे तुकडे दिसून आले. हे पाहून पोलिसही अचंबित झाले. त्यांनी मनोजला तत्काळ अटक केली. त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने हा मृतदेह आपली लिव्ह इन पार्टनर सरस्वतीचा असल्याचे कबूल केले.

पोलिसांच्या माहितीनुसार, मनोज व सरस्वतीचे कोणत्या तरी मुद्यावरून भांडण झाले होते. त्यानंतर रागाच्या भरात मनोजने सरस्वतीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने बाजारात जाऊन चेन सॉ अर्थात विद्युत करवतीने तुकडे केले. त्यानंतर ते कुकरमध्ये शिजवले. एवढेच नाही तर काही तुकडे गॅसवर भाजून नंतर ते बादली व टबमध्ये ठेवल्याचेही आढळले. पोलिसांच्या मते, आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी व दुर्गंधी दूर करण्यासाठी हे कृत्य केले असावे.

पोलिसांच्या मते, हे हत्याकांड 3-4 दिवसांपूर्वी घडल्याची शक्यता आहे. सध्या मृतदेहाचे तुकडे गोळा करून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेत. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. फ्लॅटमधून इतर पुरावेही गोळा करण्यात आलेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अधिक माहिती समोर येईल. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. फ्लॅट सील केला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.