उत्तर प्रदेश : मृतांच्या शऱीरावरील कपडे चोरुन विकणाऱ्या सात जणांच्या टोळीला बागपत पोलिसांअंतर्गत येणाऱ्या बडौत पोलीसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी करोनाबाधित मृत व्यक्तीच्या शरीरावरील कपडे चोरी करुन त्यावर ब्रॅण्डेड कंपनीचे लोगो लावून पुन्हा बाजारात विकायचे असं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या सात जणांकडून मोठ्या संख्येने कपडे ताब्यात घेतले आहे.
बडौत पोलीस स्थानकातील निरिक्षक अजय शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी लॉकडाउनसंदर्भात पोलीस तपासणी सुरु असताना एका गाडीमध्ये ब्रॅण्डेड कपडे असल्याचं पोलिसांना आढळून आलं. पोलिसांना यासंदर्भात शंका आली तर त्यांनी या कपड्यांच्या खरेदीसंदर्भातील बील आणि इतर कागदपत्रं मागितली. मात्र ही गाडी घेऊन जाणाऱ्यांकडे गाडीतील मालासंदर्भात काहीच कागदपत्रं नव्हती. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्यावर या लोकांनी आपण मृतांच्या शरीरावरील कपडे चोरुन विकत असल्याचं मान्य केलं.
हे लोकं मृतांच्या शरीरावरील कपडे चोरायचे. नंतर ती कपडे धुवून त्यावर ब्रॅण्डेड कंपनीचा लोगो लावून ते विकायचे. पोलिसांनी सात लोकांना अटक केली असून त्यांच्याकडे ५२० मृतदेहावर टाकण्यात येणाऱ्या चादरी, १२७ कुर्ते, १४० पॅण्ट, ३४ धोतरं, १२ गरम शाली, ५२ साड्या, तीन रिबिन्सची पाकिटं, १५८ ब्रॅण्डेड कपड्यांचे स्टीकर्स सापडले आहेत.
पोलिसांनी तपास केला असता मरण पावलेल्यांच्या अंगावरील कपडे विकणाऱ्याचा हा उद्योग मागील दोन वर्षांपासून सुरु होता. मागील वर्षी करोनासारखा संसर्गजन्य रोगामुळे अनेकजण दगावत असतानाही या लोकांनी हा मृतदेहांवरील कपडे चोरण्याचा उद्योग सुरु ठेवला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करुन तुरुंगामध्ये पाठवलं आहे.