पिंपरी : देवदर्शन करुन घराकडे पायी निघालेल्या तरुणीचा पाठलाग करुन, अंगावर, प्रायव्हेट पार्टवर दारू, चटणी ओतून, डोळ्यात चटणी टाकून, ब्लेडने वार करून, कपडे फाडून विनयभंग केला. हा प्रकार गुरुवारी सकाळी साडे अकरा ते दुपारी सव्वा बारा दरम्यान पंढरकर सभागृह मागे, गुरुदेवनगर, गंगानगर, निगडी येथे घडली.
या प्रकरणी पीडित तरुणीच्या बहिणीने फिर्याद दिली आहे. तर चेतन घाडगे (31, रा. औंधगाव) याच्यासह इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घाडगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची 27 वर्षीय बहीण देवदर्शन घेऊन घराकडे निघाली होती. दरम्यान रस्त्यावर तिघेजण उभा होते. त्यातील एकाने म्हटले ‘काढ रे तो कोयता, हिच्यावर वार कर’ असे म्हटले. त्यामुळे पीडित तरुणी पळत सुटली.
भीतीपोटी ती पंढरकर सभागृहाच्या मागे असणाऱ्या सार्वजनिक शौचालयात जाऊन बसली. त्या ठिकाणी हे तिघे आले. त्यानी पीडित तरुणीच्या अंगावर आणि प्रायव्हेट पार्टवर दारु आणि चटणी टाकली. त्यानंतर तरुणीच्या डोळ्यात चटणी टाकून हातावर ब्लेडने वार केले आणि तिचे कपडे फाडले.
पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पीडित तरुणीच्या बहिणीकडून माहिती घेऊन एकाला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करुन याचा पुढील तपास सुरु केला आहे.