पिंपरी : चाकण एमआयडीसी मधील एटीएम मशीन अज्ञातांनी स्फोट करून फोडले. धक्कादायक म्हणजे स्फोट करण्यासाठी डीटोनेटर जिलेटीनचा वापर केल्याचे समोर येत आहे. एटीएम मधील सुमारे २८ लाखांची रक्कम लंपास केली असून एका नागरिकाने चोरट्यांना हटकले असता त्याच्यावर पिस्तुल रोखण्यात आले असल्याची माहिती महाळुंगे पोलिसांनी दिली आहे.
भांबोली ( ता. खेड ) गावाच्या हद्दीत मुख्य रस्त्याच्या लगत हिताची कंपनीचे एटीएम आहे. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास येथे आलेल्या अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम मधील पैसे काढण्यासाठी चोरट्यांनी स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटामध्ये मध्ये एटीएम मशीनचे मोठे नुकसान झाले. स्फोट घडवून चोरट्यांनी मशीन मधील रोकड लंपास केली.
घटनेची माहिती मिळताच महाळुंगे पोलीस चौकीचे पथक, गुन्हे शाखेचे पथक व श्वान पथक घटनास्थळी पोहोचले. हिताची कंपनीच्या एटीएममधून सुमारे २८ लाख रुपये काढण्यात चोरटे यशस्वी झाले. तर मशीनच्या फुटलेल्या भागात १० ते ११ लाख रुपये सुरक्षित राहिले आहेत.
डीटोनेटर जिलेटीनच्या साह्याने बॅटरी व वायर लावून सदरचा स्फोट घडवून आणला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र यात गंधक किंवा अन्य कोणती स्फोटके वापरुन स्फोट करण्यात आला याचाही तपास सुरू आहे. यावेळी सोमनाथ पिंजण यांनी चोरट्यांना हटकले असता, त्यांच्यावर एकाने पिस्तुल रोखले तर दुसऱ्याने ‘उसको गोली मारो’ असे म्हटले.
पोलिसांनी परिसरात किती सीसीटीव्ही कॅमेरे आहेत यांचा आढावा घेऊन त्या सर्व कॅमेऱ्यांचे फूटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. महाळुंगे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदर एटीएम सेंटरवर सुरक्षा रक्षक, आलार्म आदी सुरक्षा व्यवस्था नेमण्याच्या सूचना देऊनही हिताची कंपनीने आणि संबंधित ठेकेदार कंपनीने दुर्लक्ष केले. त्यामुळे हिताची कंपनी व ठेकेदार कंपनीला चोरट्यांना सहकार्य केल्याच्या संशयातून सहआरोपी करण्यात आले असल्याचे महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद पवार यांनी सांगितले.