पिंपरी : एक महिन्यापूर्वी येरवडा परिसरातून बेपत्ता झालेल्या सासूचा शोध पिंपरी चिंचवड पोलिसांनी लावला आहे. मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोजच्या भांडणाला कंटाळून सुनेने सासूचा खून केल्याचे समोर आले आहे.
येरवडा येथील सोजराबाई जोगदंड ही महिला मिसिंगची तक्रार 14 जुलै रोजी दाखल करण्यात आली. पुणे पोलिसांनी याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात सविस्तर वृत्त पाठविले मात्र एकमहिन्या नंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील युनिट दोनच्या पथकातील कर्मचारी यांना खबरी मार्फत माहीती मिळाली. या माहितीनुसार, एका महिलेच्या हत्येत सहभागी असलेला आरोपी हा निगडी ओटा स्कीम येथे मुक्त संचार करतोय. तात्काळ पोलिसांनी सापळा रचून एकाला ताब्यात घेतले आणि पोलीसी खाक्या दाखवताच झाला एका खुनाचा उलगडा.
आरोपी इम्तियाज शेख याने त्याची मावशी मुन्नी जोगदंड हिच्या मदतीने मावशीच्या सासूची हत्या केल्याची माहिती उघड केली. पोलीस तपासात आरोपी इम्तियाज याच्यावर हत्येचे दोन गुन्हे देखील दाखल असून सध्या तो येरवडा कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता. आरोपींनी सोजराबाई जोगदंड यांची गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह मावळातील देहूरोड परिसरात एका पुलाजवळ झुडपात टाकून दिला.
आरोपीने हत्या करून टाकलेला मृतदेह पोलिसांनी पंचासमक्ष ताब्यात घेतला असून हत्येतील आरोपी शेखच्या युनिट दोनच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तर या खून प्रकरणातील आरोपी सून मुन्नी जोगदंड ही सध्या फरार असून पोलीस तिच्या मागावर असून लवकरच तिला अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.