मुंबई: पोलीस खात्यात निलंबित झाल्याने गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी आणि स्वत:ची कार्यक्षमता सिद्ध करुन, पुन्हा प्रकाश झोतात येण्यासाठी सचिन वाझे यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट रचल्याचा खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहे. गेल्या चार दिवसांपासून ‘एनआयए’कडून सचिन वाझे यांची चौकशी सुरु आहे.
एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, सचिन वाझे यांना पुन्हा प्रकाशझोतात यायचे होते. ख्वाजा युनूस प्रकरणामुळे पोलीस दलात गेलेली आपली पत पुन्हा मिळवायची होती. त्यामुळे सचिन वाझे यांनीच मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडी ठेवली. त्यानंतर याप्रकरणाचा यशस्वीपणे माग काढल्याचे श्रेय त्यांना मिळवायचे होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
2 डिसेंबर 2002मध्ये घाटकोपर येथे बसमध्ये बॉम्ब स्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता तर 39 लोक जखमी झाले होते. या प्रकरणी ख्वाजा युनूसला अटक करण्यात आली होती. 27 वर्षीय ख्वाजा युनूस हा परभणीचा रहिवासी होता. तो व्यवसायाने इंजीनियर होता. दुबईत काम करत होता. त्याला पोटाही लावण्यात आला होता. 6 जानेवारी 2003 मध्ये युनूसची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. युनूसची चौकशी करण्यासाठी त्याला औरंगाबादला नेण्यात येत होते. त्यावेळी तो फरार झाल्याचा पोलिसांनी दावा केला होता.