पुणे : कोथरूडमध्ये अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. खेळत असताना मित्राचा राग डोक्यात ठेवून सिमेंटचा दगड मारून खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.
विश्वजीत वंजारी (11) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. केळेवाडी परिसरात तो राहत होता. 29 जानेवारीपासून तो बेपत्ता होता. कोथरूड पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल होता. याप्रकरणी त्याच्या आईने फिर्याद दिली होती.
या मुलाचा शोध घेत असताना रविवारी दुपारच्या सुमारास पौड रस्त्याशेजारी असणाऱ्या एका निर्जन ठिकाणी त्याचा मृतदेह सापडला होता. तपासादरम्यान पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यानेच खून केल्याची कबुली दिली.
याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाने क्राईम पेट्रोल मालिका पाहून अतिशय थंड डोक्याने खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.