पुणे: जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. शिवणकामासाठी घराबाहेर पडलेल्या एका अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करून दोन आरोपींनी या मुलीला शेतात ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपींनी या मुलीचे फोटो काढून घेत याबाबत वाच्यता केल्यास हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर यातील दोन आरोपींना पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत तर एक जण फरार झालाय.
पोलिसांनी या प्रकरणी सौरभ भगवान वाळुंज आणि आदित्य गुलाब कबाडी या दोन आरोपींना अटक केली आहे. तर तिसरा आरोपी करण शिवाजी वाळुंज हा फरार झाला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने आज जुन्नर पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपींविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी व तिच्या बहिणीची मुलगी 20 डिसेंबर रोजी शिवणकामासाठी गावातील दुकानात गेल्या होत्या. शिवणकाम संपल्यानंतर घरी परत येत असताना सौरभ वाळुंज व त्याचा मित्र करण यांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर दोघांनी पीडित मुलीला जवळच्या शेतामध्ये ओढून नेत तिच्यावर अत्याचार केला. तसेच पीडित मुलीचे फोटो काढून याबाबत कुणाला सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर दोन्ही आरोपी त्यांचा मित्र आदित्य कबाडी त्याच्या गाडीवर बसून पळून गेले.
दरम्यान काही दिवसांनी पीडित मुलीच्या आईला हा संपूर्ण प्रकार समजल्यानंतर तिने मुलीकडे विचारपूस केली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. आरोपींनी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे याबाबत सांगितले नसल्याचे पीडित मुलीने आईला सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन दोन आरोपींना अटक केली आणि फरार असलेल्या आरोपीचा शोध सुरू केला आहे.