पुणे : गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीला मदत करतो असे सांगून त्याच्या नातेवाईक तरुणीकडे पोलीस हवालदाराने शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुणे पोलीस दलात घडला असून याची चौकशी सुरु आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार दादाराम ताकमोडे या कर्मचाऱ्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 27 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. दादाराम हे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहेत. तर यातील फिर्यादी तरुणीच्या नातेवाईकावर स्वारगेट पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे. त्याला बंडगार्डन पोलीस ठाण्यात लॉकअपमध्ये ठेवले आहे.
यादरम्यान संबंधित पोलीस हवालदाराने या तरुणीच्या नातेवाईकाला मदत करण्याच्या बहाणा केला. तरुणीची ओळख करून घेतली. तिचा मोबाईल नंबर घेतला आणि ओळख वाढवली. त्यानंतर वेळीवेळी तिच्याशी फोनवर बोलत राहिला. त्यांनतर 24 डिसेंबर 2020 रोजी लग्नासाठी स्थळ दाखविण्याचा बहाना करत तिला पुणे स्टेशन परिसरातील एका लॉजवर घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तरुणीने तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.