नवी मुंबई : गाडीचा हप्ता न भरल्याने बापाने स्वत:च्या दोन मुलांवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. ही घटना नवी मुंबईमधील ऐरोली सेक्टर-2 मध्ये घडली आहे.
भगवान पाटील (वय 71 वर्ष) हे निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. ते नवी मुंबईतच हवालदार पदावर कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते आपल्या कुटुंबीयांसोबतच राहत होते.
मात्र, आपल्या दोन्ही मुलांशी त्यांचे सातत्याने वाद होत होते आणि त्यामुळेच त्यांची दोनही मुलं वेगवेगळी राहत होती. आज (14 जून) अचानक भगवान पाटीलने आपल्या दोन्ही मुलांना घरी बोलावलं आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
भगवान पाटीलचे विजय आणि सुजय ही दोन्ही मुलं वेगवेगळी राहत होती. आज या दोन्ही मुलांना भगवान पाटीलने घरी बोलावून घेतलं. यावेळी भगवान पाटीलने आपल्या जवळील रिव्हाल्वरमधून अचानक दोन्ही मुलांवर चार गोळ्या झाडल्या.
ज्यापैकी विजय पाटील याला तीन गोळ्या लागल्या. एक गोळी ही विजयच्या खांद्याला लागली तर गोळी थेट पोटात घुसली.
तर विजयचा भाऊ सुजय पाटील याच्या पोटाला एक गोळी चाटून गेली. यामुळे सुदैवाने त्याला गंभीर इजा झाली नाही. तिसरी गोळी ही गाडीच्या काचेला लागली आहे.
मात्र, विजय पाटील याच्या थेट पोटात गोळी घुसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तात्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, काही वेळापूर्वीच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी निवृत्त पोलीस अधिकारी भगवान पाटीलला रबाळे पोलिसांनी तात्काळ अटक केली.
आरोपी भगवान पाटील याचा शीघ्रकोपी स्वभाव असल्याने त्याच्या दोन्ही मुलांचं त्याच्याशी अजिबात पटत नव्हतं. त्यामुळे काही वर्षांपूर्वीच दोन्ही मुलांनी ऐरोलीतील घर सोडून दुसरीकडे आपलं बिऱ्हाड वसवलं होतं.
आज भगवान पाटीलने आपल्या दोन्ही मुलांना घरी बोलावून घेतलं. यावेळी गाडीचा हप्ता न भरण्यावरुन त्याचा आपल्या मुलांशी वाद झाला.
दोन्ही मुलांनी गाडीचा हप्ता वेळेत भरला नाही आणि त्यावरुनच त्यांच्यात वाद झाला आणि हा वाद एवढा टोकाला गेला की, भगवान पाटीलने आपल्या रिव्हाल्वरमधून थेट मुलांवर गोळ्या झाडल्या.
दरम्यान, गोळीबाराचं हे प्राथमिक कारण सांगितलं जात आहे. पण रबाळे पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आरोपीने गोळीबार का केला? याविषयी नेमकी माहिती चौकशीनंतरच समजू शकेल.