पुणे : राज्यात सध्या अनेक पेपरफुटी प्रकरणे समोर येत आहेत. अशातच आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य भरती परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाची परीक्षा घेणाऱ्या न्यासा कंपनीतूनच गट ‘क’ चा पेपर फुटल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी दोन एजंटना पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
निशीद रामहरी गायकवाड (43 रा. 501 शेवळकर गार्डन, साऊथ अंबाझरी रोड, नागपूर मुळ रा. 52, आशियाड कॉलनी, शेगांव-रहाटगांव रोड, अमरावती) व त्याचा साथिदार राहुल धनराज लिंघोट (35 रा. देवी पार्क, जावरकर लॉनच्या मागे, अमरवाती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपी निशीद गायकवाड याने परीक्षेपूर्वीच पेपरफोडून ते एजंट द्वारे परीक्षार्थींकडे दिल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने तपास करुन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणी दोन लिंक समोर आल्या आहेत. पहिल्यांदा आरोग्य विभागाचा सह संचालक महेश बोटले, मुख्य प्रशासकी अधिकारी, आरोग्य विभाग लातूर प्रशांत बडगिरे, वैद्यकिय अधिकारी आरोग्य विभाग आंबाजोगाई डॉ. संदीप जोगदंड, राजेंद्र सानप यांना अटक करण्यात आली होती.
आता हा पेपर जिथून प्रिंट झाला तिथूनच फुटला असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या पेपरफुटीच्या दोन लिंक आतापर्यंत तपासात समोर आल्या आहेत. आतापर्यंत या प्रकरणात 18 आरोपींना अटक केली असून यामध्ये विभागातील अधिकारी, कर्मचारी, एजंट आणि काही परीक्षार्थींचा समावेश आहे. आरोपींनी 100 पैकी 92 प्रश्न परीक्षेपूर्वीच फोडले होते.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक डी.एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनिट 4 जयंत राजूरकर हे करीत आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ, पोलीस अंमलदार राजकुमार जाबा, पुंडलीक, अश्वीन कुमकर, चालक सोनूने, शाहरुख शेख, श्रीकांत कबूले यांच्या पथकाने केली.