पुणे : महिला पोलीस आणि पोलीस पती असलेल्या दोघांनी नातेवाइकांच्या मदतीने एका तरुणाचे अपहरण केले. इंदापूर जवळील जंगलात नेऊन त्याला मारहाण केली. तसेच त्याच्याकडे दहा लाख रुपये अथवा किडनीची खंडणी मागितली. हा प्रकार ५ डिसेंबर रोजी घडला असून एक आठवड्यानंतर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सूरज असगर चौधरी (२१, रा. ओटास्कीम, निगडी) असे अपहरण, मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला पोलीस शिपाई मनीषा साळवे, पोलीस शिपाई विजय कुमार साळवे, नंदकुमार कांबळे, आक्की लोंढे, सनी लोंढे, विनय लोंढे, मनीषा साळवेची आई यांच्यावर गुन्हा करण्यात आला आहे.
वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलीस शिपाई मनीषा साळवे ही पिंपरी वाहतूक शाखेत कार्यरत आहे. तर आरोपी विजय साळवे हा पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे नेमणुकीस आहे. आरोपी मनीषा हिचे आणि फिर्यादी सूरजचे अनैतिक संबंध होते. मनीषा हिने सूरजकडून काही पैसे घेतले होते.
ते पैसे देण्यासाठी आरोपीने सूरजला ५ डिसेंबर रोजी थेरगाव येथील रॉयल कोर्ट सोसायटी समोर बोलावून घेतले. सूरज ५ डिसेंबर रोजी सकाळी सव्वादहा वाजता बोलावलेल्या ठिकाणी गेला. त्यानंतर आरोपींनी सूरजला एका गाडीत जबरदस्तीने बसवून इंदापूरजवळ असलेल्या जंगलात नेले.
तिथे आरोपींनी सूरजला लाकडी दांडक्याने, कोयत्याने मारहाण केली. दरम्यान आरोपींनी सूरजचा मोबाईल फोन घेतला. मनीषा हिने सूरजसोबत असलेले फोटो आणि व्हिडिओ नष्ट करण्याच्या उद्देशाने सूरजचा मोबाईल फोन फोडून फेकून दिला.