नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये एका आक्षेपार्ह सीडी प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे. आक्षेपार्ह सीडी प्रकरणातील संबंधित महिलेचं अपहरण झालं असल्याचा दावा पीडितेच्या आई वडिलांनी आता केला आहे. पीडित महिलेच्या आई-वडिलांनी बुधवारी बेळगाव पोलीस ठाण्यात आपल्या मुलीचं अपहरण झालं असल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच आपला जीव धोक्यात असल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 मार्च रोजी बेपत्ता महिलेच्या पालकांनी बेळगाव पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. तसेच आपल्या जीवालाही धोका असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 2 मार्च रोजी आपल्या मुलीचं अपहरण झालं असल्याचा दावा पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे.
2 मार्च याच दिवशी संबंधित आक्षेपार्ह सीडी उघडकीस आली होती. याच दिवशी आपण आपल्या मुलीशी शेवटचं बोललो असा दावाही पीडितेच्या वडिलांनी केला आहे. याबाबत अधिक माहिती देताना पीडितेच्या वडिलांनी ‘संबंधित व्हिडीओमध्ये दिसणारी महिला माझी मुलगी नाही. कोणीतरी आपल्या मुलीसारख्या दिसणाऱ्या महिलेचा वापर केला आहे.
याबाबतचा खुलासा स्वतः पीडित मुलीने आपल्या आईकडे केला असल्याचंही वडिलांनी सांगितलं आहे. याबाबत पालकांनी दोन मिनिटांचा व्हिडीओ जारी केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपला जीव धोक्यात असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.