पुणे : हॉस्पिटलमधील प्रायव्हेट रुममधील बाथरुममध्ये महिलेला अंघोळ करीत असताना पाहून तिचा पाठलाग करुन विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी हॉस्पिटलमधील कर्मचार्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आयाज शेख (२५, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, खडकी) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचार्याचे (वॉर्ड बॉय) नाव आहे. ही घटना गणेशखिंड रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये शनिवारी घडली. याबाबत बाणेर येथील एका ४२ वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ८३/२२) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाचे हाताचे ऑपरेशन गणेशखिंड रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. मुलाचे ऑपरेशन झाल्यानंतर फिर्यादी या प्रायव्हेट रुममध्ये आल्या. आंघोळीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी आयाज शेख हा बेडशिट बदलण्यासाठी त्यांच्या रुममध्ये आला.
बेडशिट बदलून झाल्यानंतर शेजारच्या रुमचे जाळीतून फिर्यादी यांना आंघोळ करताना नग्न अवस्थेत पाहून त्यांचा पाठलाग करुन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.