बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते रविराज सदाशिवराव तावरे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे घडली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 31) भर सायंकाळी घडला.
तावरे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. गोळीबाराच्या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर तावरे यांना तातडीने बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रविराज तावरे हे त्यांची पत्नी आणि जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या समवेत सायंकाळी पावणे सातच्या सुमारास संभाजीनगर येथे वडापाव आणण्यासाठी गेले होते. यावेळी वडापाव घेऊन गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवरुन आलेल्या दोघाजणांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
या घटनेनंतर तावरे खाली कोसळले. तर गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नीला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे धक्का बसला. यातूनही त्यांनी स्वतःला सावरत आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर गोळीबार करुन फरार झाले.
जखमी अवस्थेत रविराज तावरे यांना दादा जराड, मयुर भापकर, युवराज जेधे, आदेश डोंबाळे यांनी तातडीने मित्राच्या कारमधून बारामती येथे खासगी रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.