पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवन जवळ वरकुटे बुद्रुक हद्दीत शुक्रवारी (दि.26) पहाटे चारचाकी गाडीवर गोळीबार करुन तब्बल साडेतीन कोटी रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि इंदापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह सहा जणांना पोलिसांनी 72 तासाच्या आत अटक करुन लुटीतील रक्कम जप्त केली आहे.
टोळीचा प्रमुख सागर शिवाजी होनमाने (34 रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर), बाळु उर्फ ज्योतिराम चंद्रकांत कदम (32 रा. कुर्डुवाडी), रजत अबू मुलाणी (24 रा. न्हावी, ता. इंदापूर), गौतम अजित भोसले (33 रा. वेने ता. माढा), किरण सुभाष घाडगे (26 रा. लोणीदेवकर, ता. इंदापूर), भूषण लक्ष्मीकांत तोंडे (25 रा. लोणीदेवकर) या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत भावेशकुमार अमृत पटेल (रा. कहोडा, ता. उंझा, जि. मेहेसाना, गुजरात) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी मुख्य आरोपी सागर होनामाने, ज्योतीराम कदम आणि रजत मुलाणी या तिघांना कुर्डुवाडी परिसरातून अटक केली. तर गौतम भोसले, किरण घाडगे, भूषण तोंडे या तिघांना राजस्थानमधील उदयपुर परीसरातून ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.