त्यांनी दगड मनावर ठेवावा की डोक्यावर….

0

पुणे : आधीच झेड सुरक्षाव्यवस्था असलेल्या एकनाथ शिंदे यांना गडचिरोलीचे पालकमंत्री या नात्याने अधिक सुरक्षा होती. त्यामुळे शिंदे यांची सुरक्षा काढून घेतल्याचा दावा तथ्यहीन आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवार) व्यक्त केले. सरकार असेच चालवायचे आहे, की सबंध सत्ता केंद्रित ठेवून दोघांनी चालवायचे ही भूमिका घेतलेली दिसते. त्याला राज्यातल्या आणि केंद्रातल्या सहकाऱ्यांची संमती दिसते, असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवण्याबद्दलची वस्तुस्थिती मला माहिती नाही. सुरक्षा कोणाला कशी आणि किती द्यायची हे कॅबिनेट आखत नाही. याबद्दल कॅबिनेटमध्ये चर्चा होत नाही. याबद्दल चर्चा करण्यासाठी मुख्य सचिव, गृह सचिव या वरिष्ठ लोकांची कमिटी असते. आज मी सकाळी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटलो. त्यांनी मला स्पष्ट सांगितले की एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा होती. तसेच त्यांच्याकडे गडचिरोलीचा पदभार असल्याने अतिरिक्त फोर्स त्यांना देण्यात आला होता. त्यामुळे मला असं वाटतं याबद्दल अधिक चर्चा करण्याची गरज नाही, असंही पवार म्हणाले.

राज्यातील सत्ताबदलासाठी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे लागले, या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानासंदर्भात विचारले असता, त्यांनी दगड मनावर ठेवावा की डोक्यावर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याविषयी मला काही बोलायचे नाही, अशा शब्दात शरद पवारांनी टोला लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.