मुंबई : एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेली ऑफर हा कट असल्याचा आरोप मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.भाजपाचे हिंदुत्व थोतांड आहे हे जनतेला दाखवण्याची गरज आहे,शिवसैनिक हा हिंदुत्वाचा अंगार असतो हे त्या भंगारांना दाखवून द्या,आणि भाजपाचे मुस्लीमप्रेम जनतेसमोर आणा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानावेळी केले.यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपाचा खरपूस समाचारही घेतला.
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केले.त्यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार प्रहार केला.धगधगता निखारा ही शिवसेनेची ओळख असून ती राख झटकून टाकून त्याची धग विरोधकांना दाखवण्याची गरज असल्याचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.पक्ष वाढवण्याची गरज आहे असे सांगताना ठाकरे म्हणाले की,लोकसभा,विधानसभा आणि काही महानगरपालिका निवडणुकांच्या सोडल्या तर बाकीच्या निवडणुका आपण गांभीर्याने घेत नाही.मात्र आता तसे करुन चालणार नाही.भाजपाचे पंचायत ते संसद हे स्वप्न आहे.या सत्तेच्या ठिकाणी दुसरे कोणी असता कामा नये या त्यांच्या धोरणाला रोखले पाहिजे, असे आवाहन करीत,आपल्या बुडाखाली संपूर्ण देश असला पाहिजे या अट्टहासाने भाजप चालले आहेत. ही घातक हुकूमशाहीची नांदी आहे. हे आपले हिंदुत्व नव्हते आपण राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करत नाही हा मुख्य फरक आहे असा टोलाही त्यांनी भाजपला यावेळी लगावला.
आम्ही भाजपाला सोडले आहे,हिंदुत्वाला नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी करून, सत्ता असो किंवा नसो आम्ही हिंदुत्वाला सोडणार नाही असेही त्यानी यावेळी ठणकावले.ठाकरे यांनी यावेळी उत्तर प्रदेशातील निवडणुकांवरून भाजपला लक्ष्य केले.उत्तर प्रदेशात त्यांनी मोठा विजय मिळवला असे काही नाही.सपाच्या जागाही वाढल्या आहेत.त्यामुळे एक भ्रम निर्माण करून संमोहन केले जात आहे. यापूर्वी इस्लाम खतरे मे है म्हणायचे, आता हिंदू खतरे मे अशी नवीन बांग त्यांची सुरु आहे. दरवेळी अनामिक भीती दाखवायची असे सांगतानाच, इतिहासाच्या खपला काढल्या जात असून हा डाव मोडून काढला पाहिजे, असे आव्हान त्यांनी यावेळी केले.शिवसेनेला मुस्लीमधार्जिणे म्हणत आहेत.मी मोहन भागवत यांची काही वाक्ये घेऊन बसलो आहे.जर मला जनाब म्हणणार असाल तर तुमच्या सरसंघचालकांना काय बोलणार आहात ? भागवतांच्या नावापुढे खान किंवा जनाब जोडणार आहात का ? असा सवालही त्यांनी केला.तुमची सत्तेची स्वप्ने आम्ही चिरडून टाकली म्हणून आम्ही मुस्लीमधार्जिणे असू तर मोहन भागवतांनी काय सांगितले आहे ते ऐका असे त्यांनी भागवतांची काही वक्तव्ये यावेळी वाचून दाखवत आरएसएसला मुस्लीम संघ की राष्ट्रीय मुस्लीम म्हणायचे का ? असा सवालही त्यांनी केला.
अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तीसोबत ज्यांनी सत्तेसाठी मांडीघाशी केली तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणे शक्य नाही. आणि मी तो कदापि येऊ देणार नाही.सत्ता मिळत असली तरी एमआयएमसोबत जाणार नाही, असे सांगत त्यांनी एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून लावला.औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचे असे सांगून,आम्ही भाजपासारखे सत्तेसाठी लाचार नाही.त्यामुळे एमआयएमसोबत जाणे शक्य नाही,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.भाजपाचे हिंदुत्व थोतांड आहे हे जनतेला दाखवण्याची गरज असून,वाजपेयी यांनी भारत-पाकिस्तान बससेवा सुरु केली होती.त्यावेळीही यावरुन टीका झाली होतीनवाज शरिफ यांच्या वाढदिवसाचा केक खाणारे मोदीहे सर्व आम्ही पाहत आहोत.जिनांच्या थडग्यावर नतमस्तक कोण झाले होते हे पाहिले आहे.आम्हाला पाकधार्जिणी म्हणणार असाल तर जास्त गोष्टी कोणाच्या काळात झाल्या हे पाहणे गरजेचे आहे असू सांगून, आम्ही भाजपला पाकिस्तान जनता पार्टी, हिजबूल जनता पक्षही म्हणू शकतो. तुम्ही कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणार असाल तर आम्ही कमरेचे सोडणार नाही पण तुमचे उघडे पडलेले जनतेला दाखवून देऊ,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
देशाला सात वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाल्याचे तारे कोणीतरी तोडले होते असे सांगून गेल्या सात वर्षात काय झाले ते सांगा ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ठाकरे यांनी यावेळी सध्या गाजत असलेल्या कश्मीर पाईल्स या चित्रपटावरही भाष्य केले.चित्रपटाच्या माध्यमातून जी फाईल उघडली आहे तो काळ आठवा.ज्यावेळी काश्मीरमध्ये हिंदू आणि त्याआधी देशाच्या बाजूने असणाऱ्या मुस्लिमांवर अत्याचार झाला.त्यावेळी भाजपाने समर्थन दिलेल्या व्ही पी सिंग यांचे सरकार होते.पंतप्रधान झाल्यावर ते कोणत्याही मंदिरात नाही तर दिल्लीतील जामा मशिदीत जाऊन शाही इमामला भेटून आले होते.त्याला आपण विरोध केला होता.त्यावेळी भाजपाने यावर एकही अवाक्षर काढले नव्हते.त्यावर फक्त बाळासाहेब ठाकरेंनी आवाज उठवला होता.पण सध्या अश्रू ढाळत असलेल्या एकानेही ब्र काढला नव्हता आणि हिंमतही नव्हती, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला. अमरनाथ यात्रा रोखली तर हजसाठी एकही विमान उडू देणार नाही असे कोणीही बोलले नव्हते. दहशतवाद्यांना अंगावर घेणारे बाळासाहेब ठाकरे एकच मर्द होते,दुसरे कोणीही नव्हते असेही शिवसेना पक्षप्रमुख यांनी सांगितले.