चार राज्यांमध्ये काॅंग्रेसने केले महत्वाचे बदल
राज्यात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांवर काॅंग्रेसचा पुन्हा विश्वास
नवी दिल्ली : १० जनपथ येथील निवासस्थानी पक्षातील नाराज नेत्यांसोबत स्वतः सोनिया गांधी यांनी शनिवारी नाराज नेत्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. प्रारंभीच्या टप्प्यात महाराष्ट्र, तेलंगण, गुजरात आणि मध्य प्रदेश या चार राज्यांमध्ये फेरबदल करण्यात येणार आहेत. या बैठकीनंतर विविध राज्यांमध्ये पक्ष, संघटनेतील फेरबदलांना सुरवात झाली आहे.
कॉंग्रेसने हायकमांडने शनिवारी मुंबई प्रदेश कॉंग्रेस कमिटीत बदल केले आहेत. अडीच वर्षांनंतर भाई जगताप यांच्याकडे मुंबई काँग्रेसची धुरा देण्यात आली आहे. जगताप यांच्यासोबत अनुभवी टीमही देण्यात आली आहे. चरणजीत सिंग सप्रा यांची कार्याध्यक्षपदी, माजी मंत्री नसीम खान यांची प्रचार समिती प्रमुखपदी तर सुरेश शेट्टी यांची जाहीरनामा प्रमुखपदी वर्णी लागली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून एकनाथ गायकवाड यांना हटवण्यात आलं आहे.
हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची आणि खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत तेलंगणमधील कॉंग्रेस प्रदेशाध्य अध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातमध्ये पोटनिवडणुकीत पक्षाच्या सुमार कामगिरीची जबाबदारी स्वीकारत गुजरातमधील कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित चावडा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्यावरही प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जात आहे.
पुन्हा काॅंग्रेसने बाळासाहेब थोरातांवर विश्वास टाकला
बाळासाहेब थोरात यांच्यावर मात्र काँग्रेस हायकमांडने पुन्हा विश्वास टाकला आहे. थोरात यांच्या नेतृत्वात मुंबई कॉंग्रेससाठी छाननी समिती आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनिती आखण्याकरता समिती स्थापन करण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाचे नेतेही आहेत.