पिंपरी : पत्नीचे निधन झाल्याचे सांगत, महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून, त्यांच्या सोबत लग्न करुन पोलीस महिलेसह चार महिलांची फसवणूक केली. या प्रकरणी 60 वर्षीय लखोबा विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. तर च-होली बुद्रुक येथील 60 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार सन 2013 ते 20 डिसेंबर 2020 या कालावधीत विनायक नगर नवी सांगवी, भोसरी, प्रतीक लॉज चाकण, नित्यानंद लॉज फुरसुंगी येथे घडला आहे. आरोपी व्यक्तीने त्याची पहिली पत्नी मयत झाली आहे, असे खोटे सांगून फिर्यादी महिलेसोबत सन 2014 साली विवाह केला. त्यानंतर त्याने आणखी दोन महिलांसोबत विवाह केला. त्यामध्ये एका पोलीस महिलेचा देखील समावेश आहे.
फिर्यादी महिलेच्या परस्पर विवाह करून तिची फसवणूक केली. लग्नाच्या अगोदर आणि लग्नानंतर फिर्यादी महिलेचा क्रूरतेने लैंगिक छळ केला. फिर्यादी महिलेला आरोपीने मारून टाकण्याची धमकी दिली. हा त्रास वाढत गेल्याने तिने थेट पोलीस ठाणे गाठत गुन्हा नोंदवला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास भोसरी पोलीस करीत आहेत.