पिंपरी : भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (ता.6 मार्च) पिंपरी-चिंचवड येथील विकासकामांचे उद्घाटन झाले आहे. या कार्यक्रमस्थळी राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि गोंधळ निर्माण झाला. यावेळी फडणवीस यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर चपला आणि बांगड्या फेकण्याची घटना घडली आहे. एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आंदोलकांवर लाठचार्ज केला आहे.
पिंपरी-चिंचवड मधील विविध विकासकामांचे उद्घाटन आज (ता.6 मार्च) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये अटल बिहारी वाचपेयी उद्यानाचेही उद्घाटन होणार आहे. या उद्यानाचे काम अर्धवट करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यास प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी सुरू केली. यामुळे येथील परिस्थिती चिघळली आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यामुळे पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही करावा लागला. परिस्थिती हाताबाहेर जावू नये याकरिता पोलिसांचा बंदोबस्त वाढवला होता.