पुणे : दुबईवरून विमानाने पुण्यात एक कोटी पाच लाख रुपये किमतीच्या सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी एका जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी आदेश दिला.
अर्शद अहमद असे जामीन अर्ज फेटाळलेल्याचे नाव आहे. दुबईतून पुण्यात आलेल्या विमानामध्ये सोने तस्करी होत असल्याची गुप्त माहिती सीमाशुल्क खात्याच्या विमानतळ गुप्तचर विभागाला मिळाली होती. या तस्करी लक्ष ठेवून विभागाने झुबेर पेणकर, महम्मद फरहान, अमीन देशमुख, अब्दुल झमाणे या आरोपींकडून दिड कोटी रुपये किमतीचे तस्करीचे सोने जप्त केले.
या गुन्ह्याच्या तपासात आरोपी अर्शद अहमदचा सहभाग असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याला २४ जून रोजी कोंढव्यातून अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहात रवानगी झाल्यानंतर अर्शद याने जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. सीमा शुल्क खात्याच्या गुप्तचर विभागाच्या वतीने विशेष सरकारी वकील संदीप घाटे यांनी या जामीन अर्जाला विरोध केला. आरोपीचा या गुन्ह्याशी संबंध नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.
त्यावर आरोपीचा या गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. त्याला जामीन झाल्यास तो पळून जाण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद ॲड. घाटे यांनी केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखल दिला. ॲड घाटे यांचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा व केंद्र सरकारविरोधातील असून, त्याचा तपास पूर्ण झाला नसल्याने आरोपीला जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.