बुटामधून सुरु होती तस्करी : 35 लाखांचे सोने जप्त

0

पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या तस्करीची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहेत. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्कर वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करीत असतात. अशाच प्रकारची एक घटना पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर  उघडकीस आली आहे. दुबईहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाला सोने तस्करीच्या आरोपात पकडण्यात आले आहे.

दुबईहून पुण्यात आलेल्या प्रवाशाने तब्बल 34 लाख 81 हजारांच्या सोन्याच्या बिस्कीटांची तस्करी आपल्या पायातील बुटामधून केल्याचा प्रकार सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) गुप्तचर यंत्रणांनी उघडकीस आणला आहे. या कारवाईत संबंधित प्रवाशाकडून 705 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत.

या प्रवाशाकडे केलेल्या तपासामध्ये तो दुबई ते अहमदाबाद आणि त्याच विमानाने पुण्यातील लोहगाव विमानतळ येथे आला होता. प्रवाशांची तपासणी करण्यात येत असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. चिकटपट्टीने बिस्कीटे गुंडाळून त्याने ती बुटात ठेवून आणल्याचे कस्टम विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली असून हा प्रकार सोमवारी (दि.7) समोर आला आहे.

पुणे कस्टम विभागाकडून तस्करीची अनेक प्रकरणे उघडकीस आणली आहेत. डिसेंबर 2021 मध्ये केलेल्या कारवाईत चेन्नई ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडून 24 कॅरेटचे 40 लाख 36 हजार रुपयांचे 800 ग्रॅम सोने जप्त केले होते. तर 8 फेब्रुवारी 2022 रोजी केलेल्या कारवाईमध्ये पुणे विमानतळावरुन शारजाह  येथे जाणाऱ्या एक. प्रवाशाकडून 6 लाखांचे विदेशी चलन जप्त केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.