मुंबई ः ”प्रभू श्रीराम आणि प्रभू श्रीकृष्णांनी जो वारसा आपल्याला दिला आहे तो इतका समृद्ध आहे की त्या वारशाने आपल्या देशात प्रत्येकाला जागा दिली. जगाने ज्या लोकांना त्रस्त केलं ते सगळे लोक भारतात आले. त्यांना भारताच्या हिंदू संस्कृतीने आपल्यामध्ये सामावून घेतलं. ज्यांनी आक्रमण केलं त्यांनाही सामावून घेतलं. जे आश्रित आले त्यांनाही सामावून घेतलं. त्यामुळे अशा समृद्ध संस्कृतीवर जो घाला घालण्यात आला होता त्याविरोधातली ही लढाई होती”, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
माधव भंडारी लिखित ‘अयोध्या’ पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केलं. त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, ”गेली अनेक शतकं रामजन्मभूमीचं आंदोलन सुरू होतं. बाबरचा सेनापती मीर बांकीने १५२८ साली अयोध्येचं मंदीर तोडून त्याठिकाणी मंदीर बांधण्याचा प्रयत्न केला. अयोध्येत जागा कमी होती का? केवळ श्रीरामाला लक्ष्य केलं गेलं. कारण, एखाद्या समाजाला परिजित मानसिकतेत न्यायचं असेल तर, त्या समाजाचा आत्मा मारावा लागतो, हेच मीर बांकीला माहीत होतं., त्यामुळे संस्कृतीवर एक प्रकराचा घाला घातला गेला”, असेही विश्लेषण फडणवीस यांनी केले.
प्रभू रामचंद्र हे भारताचे आत्मा आहेत म्हणूनच आक्रमणासाठी अयोध्या निवडली गेली. तुमच्या संस्कृतीचा आत्माच आम्ही मिटवू शकतो त्याला दाखवून द्यायचं होतं. ही लढाई मंदीर-मशिदीची नव्हती. तर, आपल्या संस्कृतीवर करण्यात आलेल्या आक्रमणाची होती, असेही फडणवीस यांनी सांगितले.